संकेश्वरचा इतिहास


शंकरलिंगाचे मंदिर जखणाचार्यांनी बांधले असुन ते ८२ फूट लांब व ४८ फूट रुंद असे पक्क्या दगडी बांधणीचे आहे. या देवळांत तीन शिलालेख असून १७ वा अधिपती जो कार्तवीर्य ४था ( ११९९ ते १२१८ ) याच्या कारकीर्दीतील आहेत. कारण इ. सन ११९९ व १२०२ तसेच शके ११२१ व ११२४ अशी शिलालेखावर नोंद आहे " असा मजकुर मुंबई गँझेटीअर (Bombay Gazetteer) च्या पृ. ६०० वर आहे. त्याअथीं हे मंदिर खासच शके ११२० पूर्वीचे आहे आणि म्हणून शके ११२० पूर्वी संकेश्वर - सांख्येश्वर ग्राम निश्चित होते. तसेच पृ. ६०२ वर पुढील आशयाचा मजकूर आहे.


कोकण प्रांताधिकारी बहादूर गिलानी यांनी बंड करुन बेळगांव आणि गोवा घेतले व सन १४८८ (शके १४१०) मध्ये संकेश्वर हे त्यांनी आपल्या गादीचे मुख्य ठाणे केले. १४ वा बहामनी राजा दुसरा मेहमूद (सन १४८२- १५१८ ) हा बंडखोरांचे पारिपत्य करण्याकरिता जमखंडीमार्गे संकेश्वरला आला, त्यावेळी संकेश्वरची तटबंदी बांधण्याचे काम पुरे झाले नसल्यामुळे तीन दिवसांतच त्यास शरण जागे भाग पडले. संकेश्वरास वेढा घालून शके १४१७ (सन १४९५ ) मध्ये बादशहाने संकेश्वर आपल्या ताब्यांत घेतले. म्हणजे सन १४८८ ते १४९५ ही सात वर्षे बेळगांव, गोवा व कोंकण या संपूर्ण प्रांताची संकेश्वर ही राजधानी होती. त्या काळात संकेश्वर गांवाची धोडीफार वाढ आली असली पाहिजे. पुढे सन १६५९ (शके १५८१ ) मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यात संकेश्वरचा समावेश होऊन कोल्हापूर जिल्हयात ते गणले गेले. 


पुढे श्री यज्ञेश्वरशास्त्री मुत्नाळकर स्वामी - श्री विद्या शंकरभारती संकेश्वर यांचे कारकीर्दीत (शके १६८९ ते १ ६९५ ) सन १७७३ मध्ये कागवाड घराण्याचे मूळ पुरुष श्री. कोन्हेरराव त्रिंबक पटवर्धन यांनी भवानराव प्रतिनिधी आदिकांची कुमक घेऊन कोल्हापूरावर स्वारी केली असतां धनलाभार्थ पेशव्यांचे आज्ञेवरुन श्री स्वार्मीचा कोल्हापुरांतील मठ लुटता व जाळला यामुळे कोल्हापुरांत नवीन मठ बांघला गेला खरा तथापि तदनंतरचे श्री संकेश्वर - करवीर पीठाचार्य संकेश्वरातच वास्तव्य करु लागल्या कारणानें मठगल्ली, नवीगल्ली इत्यादी ठिकाणी वस्ती वाढु लागली. सन १८८१ मध्ये संकेश्चरचीं लौकानैख्या ८९५१ इतकी होती.

संकेश्वर हे हुक्केरीच्या नैऋत्येला असुन, हुक्केरीहुन ८ मैल अंतरावर पुणे-बेंगळूरु महामार्गावर आहे. याची समुद्रसपाटीपासून उंची १०८० फूट आहे. हा गाव उ. अ. १६" १२' व पूर्व रे. ७४" ३४' या ठिकाणी असून हुक्केरी तालुक्यात व बेळगांव जिल्ह्यात आहे. संकेश्वर हा " सांख्येश्वर " चा अपभ्रंश होय.


महाराष्ट्रास सुपरिचीत असलेले राजकारण, धर्मकारण, समाजकारण, व सर्वच क्षेत्रात प्रसिध्द असे कोल्हापूर संस्थानाधिपती छत्रपती श्री शाहूमहाराज यांनी आपल्या असाधारण कर्तृत्वामुळे अनेक चळवळी घडवून आणल्या. सन् १९०० च्या सुमारास त्यांनी वेदोक्त प्रकरण सुरु केले. यास जगद्गुरु शंकराचार्य संकेश्वर-करवीर पीठाकडून मान्यता मिळावी म्हणून प्रयत्न झाले. श्री विद्याशंकर भारती (भिलवडीकर) ( १९ वे स्वामी ) यांनी यास अनुमती दिली नाही … परंतु सन् १९०३ साली, त्यांचे अधिकारी शिष्य ब्रह्यनाळकर-श्री विद्यानृसिंहभारती संचारात असतांना त्यांना गाठुन वेदोक्त प्रकरणास संमती मिळवली. हे कृत्य धर्मंशास्त्रविरुद्ध व गुरु आज्ञेविरुद्ध झालेने श्री गुरुस्वामी भिलवडीकर यांनी १९०६ साली ब्रहानाळकरांना पदच्युत केले. व कोल्हापूर येथे पदच्युत शिष्य परंपरा चालू झाली. 

गुरु स्वामी भिलवडीकरांनी अथणीकर - श्री विद्यानृसिंह भारती यांना विधिवत् संन्यास देऊन अधिकारी शिष्य केले. या प्रमाणे शुध्द व अविच्छिन्न परंपरा संकेश्वर येथे सुरु झाली. अथणीकरांचे शिष्य वाईकर शेंडे स्वामी हे पुढील शंकराचार्य झाले. त्यांनी श्री विद्यानृसिंह भारती शिरोळकर स्वामी यांना मठाचे अधिकार दिले. श्री शिरोळकर स्वार्मीनी १ ) श्री जेरेस्वामी वाडीकर २) श्री कवठेकर स्वामी ३ )श्री काशीकर स्वामी ४) श्री कल्याणसेवक स्वामी ५) श्री एरण्डे स्वामी या ५ जणांना संन्यास देऊन अधिकारी शिष्य केले. पहिले चार स्वामी समाधिस्थ झाल्यानंतर श्री एरण्डे स्वामी हे अधिकारी शंकराचार्य झाले. श्री एरण्डे स्वार्मीचे अधिकारी शिष्य म्हणुन सांप्रत विद्यमान २४ वे श्री जगद्गुरु शंकराचार्य म्हणून श्री प. प. सच्चिदानंद अभिनव श्री विद्यानृसिंह भारती हे पीठाधीश झाले.


यांचा विधिवत संन्यास श्री क्षेत्र मोरगांव( जि. पुणे ) येथे श्री मयुरेश्वराच्या सान्निध्यात, ब्रह्मीभुत श्री शंकराचार्य सच्चिदानंद श्री विद्यानृसिंह भारती शिरोळकर स्वामी महाराज यांच्या समाधिस्थानी झाला आहे. संन्यास विधिला श्री. प. प. नृसिंह आश्रम-तुंगार स्वामी हे उपस्थित होते. वेदमूर्ती सोमयाजी दीक्षित सुधाकर कुलकर्णी पुणे, श्री वेदमूतीं अवधूत भट्ट बोरगांवकर, वेदमुर्ती दत्तात्रेय भट्ट जोशी सातारा तसेच वे. तू रघुनाथ भट्ट जोशी संकेश्वर, ज्योतिर्विद विद्वान श्री. ज. मोडक पुणे, यश रामलिंगे पुणे, पंढरपुरचे सराफ श्री नारायणराव कुलकर्णी, श्री नाना जोशी वकील वगैरे मान्यवर उपस्थित होते. मोरगाव येथील सर्व व्यवस्था श्री वेदमुर्ती कुमार वाघ यांनी पाहिली.

संन्यासोत्तर श्री स्वामींनी वाराणसी, हरिद्वार तसेच मत्तूर (शिवमोग्गा) येथे गीता उपनिषद, ब्रह्मसूत्र, शांकर भाष्यांचे अध्ययन केले. श्रृंगेरीचे विद्यमान जगद्गुरु श्री शंकराचार्य दक्षिणाम्नाय शारदापीठाधीश्वर श्री प. प. भारती तीर्थ स्वामी महाराजांनी या स्वामींची शिफारस करुन आज्ञापत्र दिले आहे. त्या नुसार आषाढ शुध्द षष्ठी शके १९३८ दि १० जुले २०१६ श्री स्वामींचा पीठाभिषेक झाला.


श्री कल्याणसेवक महाराज समाधिस्थ झाल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी गावकरींमधून एक व्यवस्थापक मंडळ आकाराला आले. कै. श्री सीं. एम्. कुळकर्णी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली या मंडळाने पुढील अनेक वर्षे मठाचा सर्व कारभार सांभाळला. यामंडळात कै. श्री ए. बी. नाडगोंडा, कै. डॉ. व्ही. एम्. भिडे , श्री. बालकृष्ण हतनुरी, श्री आप्पत्साहेब शिरकोळी, श्री जयप्रकाश नलवडे, श्री अण्णासाहेब पर्वतराव, श्री शांतीनाथ जाबाण्णावर, श्री कृष्णकांत मुळे, कै. श्री मल्लाप्पा शेट्टीमनी, कै. श्री भीमराव दुंडगे, कै.श्री गणपती जाधव प्नभुतींचा समावेश होता. मंडळाने मठास उर्जितावस्था प्राप्त करुन देऊन काही भागाचा जीर्णोद्धारही केला.


स्वामी महाराजांच्या पीठाभिषेकाच्या वेळेस मंडळ विसर्जित केले गेले.

या काळाच्या सुरवातीस कै. श्री गोविंदराव पेंडसे यांनी व्यवस्थापक म्हणुन काम पाहिले. कै. श्री सी. एम्. कुलकर्णी यांच्या शिस्तबद्ध कारभाराची परंपरा नंतरच्या काळात व्यवस्थापकपदी नेमलेल्या श्री अर्जुन कानवडे यानी राखली आहे. मंडळाने प्रथम स्वामी महाराजांच्या नेमणूकीं संदर्भात श्रृंगेरी पीठाशी संपर्क साधला होताच. पण नंतरच्या काळात स्वामीमहाराजांच्या निवडीसंदर्भात श्रृंगेरीशी संपर्क शाधणेसाठी श्री राम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील ब्राह्मण समाजाने पुढाकार घेतला. पुढे समस्त संकेश्वरकरांच्या सहभागाने श्री स्वामींचा पीठाभिषेक घडून आला.