मठातील विविध सेवा व परंपरागत सेवेकरी घराणी


पीठाभिषेक

श्री परमहंस परिव्राजकाचार्य सच्चिदानंद अभिनव श्री विद्यानृसिंह भारती यांचा संकेश्वर येथील मठाचे शंकराचार्य म्हणून आषाढ शुद्ध षष्ठी शके १९३८, रविवार दि १० जुलै २०१६ रोजी पीठाभिषेक झाला. या मठाचे हे २४ वे पीठाधीश होत. श्रृंगेरीच्या महास्वामीजींच्या अनुमतीनेच यांची निवड झाली आहे. या सोहळ्यास श्रृंगेरी पीठाचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी, पुण्याचे संस्कृत पंडित व जेष्ठ पत्रकार पं. वसंतराव गाडगीळ हे श्रृंगेरी महास्वामीजींचा आशीर्वाद घेऊन उपस्थित होते. तसेच नाशिकचे भागवताचार्यं, ज्योतिषाचार्य
श्री. अतुलशास्त्री भगरे, कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक श्री मंदार हळबे आले होते. निडसोशी मठाच्या श्री म. नि. प्र. जगद्गुरु पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामींनी प्रभातकाळीच श्री स्वामीजींची भेट घेऊन महावस्त्र व रुद्राक्षमाळ अर्पण करुन पीठाभिषेकासाठी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या.मुतुर (शिमोगा ) चे स्वामीजी श्री बोधानंद्रेद्र सरस्वती, कंपली (बळ्ळारी) चे श्री नारायण विद्याभारती, बेंगळुरचे श्री वासुदेवानंद सरस्वती, गाणगापूरचे श्री वल्लभानंद है सर्व स्वामीजी उपस्थित होते. वाडीचे विद्वान श्री अवधूतशास्वी बोरगांवकर व नृसिंहवाडीच्या श्री दत्त संस्थानचे प्रतिनिधी म्हणून श्री श्रीकांत पुजारी व श्री राजेश खोंबारे पुजारी हे ही या प्रसंगी उपस्थित होते. यावेळी कुंदगोळच्या देसाई सरकारनी महाराजांना तलवारीची सलामी दिली. या पीठाभिषेक व पीठारोहण सोहळ्याचे पौरोहीत्य उत्तर कर्नाटकातील श्रेष्ठ विद्वान म्हणून गणले गेलेले धारवाडचे श्री राजेश्वर शास्त्री व श्री नागेश्वरशास्त्री यांच्या नेतृत्वाखाली झाले. या प्रसंगी स्थानिक खासदार श्री. प्रकाश हुक्केरी, स्थानिक आमदार श्री. उमेश कत्ती , माजी खासदार श्री. रमेश कत्ती, माजी मंत्री श्री. ए. बी. पाटील, माजी मंत्री श्री. मल्हारीगौडा पाटील या सर्व राजकीय नेत्यांनी व डॉ. सचिन पाटील खातेदार यांनी श्रीस्वार्मीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी झालेल्या लौकिक समारंभास संकेश्वर आणि परिसरातून हजारो मठाभिमानी नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना संकेश्वरचे खातेदार कुलकर्णी श्री. गिरीश कुलकर्णी यांनी गेल्या वीस वर्षातील मठाच्या कारभाराचा आढावा घेऊन या पीठाभिषेकाद्वारे श्रीस्वामी महाराजांना मठाचे सर्व अधिकार प्राप्त झाल्याचे जाहीर केले.तत्पुर्वी शनिवारी स्वामीर्जीची सवाद्य भव्य मिरवणुक काढुन त्यांचे मठात स्वागत करण्यात आले. परंपरेप्रमाणे आडव्या पालखीने निघालेल्या मिरवणूकीस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. घराघरांसमोर रांगोळ्या घातल्या होत्या. स्वागताच्या कमानी होत्या. नागरिकांनी पाणी घालून व आरती करुन स्वामीर्जीचे स्वागत केले. तब्बल तीन तास मिरवणुक चालली. पीठाभिषेकानंतर हजारो भक्तांनी महाप्रसाद ग्रहण केला.

परंपरागत सेवेकरी घराणीमठाचे पौरोहित्य वेदमूर्ती श्री श्रीपाद उपाध्ये करतात. याशिवाय मठातील धार्मिक कार्यामध्ये उपाध्ये, कोटी, जोशी,शिरपुरकर…जोशी,पुराणिक घराण्यातील ब्रह्मवृंदांचा सहभाग असतो. मंदिराच्या आतील व्यवस्थेचा मान गुरव घराण्याकडे आहे. श्री शंकरलिंग देवाची पालखी वाहण्याच्या सेवेचा मान शेट्टीमनी व लम्बी घराण्याकडे तर श्रीस्वामींची पालखी वाहण्याचा सेवेचा मान नेलींच्या भोई घराण्याकडे आहे. चाळके, केस्ती, मण्यागोळ, शिंदे, घस्ती, माणगांवी वगैरे घराण्याकडे मठाच्या इतर सेवांचा मान आहे. रथाच्या दुरुस्ती कामाचा व रथोत्सवात रथाच्या नियंत्रणाचा मान गावातील सुतार-लोहार घराण्याकडे आहे. त्याचप्रमाणे खातेदार पाटील व खातेदार कुलकर्णी है परंपरागत मानकरी आहेत.