रथोत्सव


संकेश्वर - करवीर पीठाचे संस्थापक श्री विद्याशंकर भारती देवगोसावी स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने रथोत्सव साजरा केला जातो. या उत्सवामध्ये ओढला जाणारा आताचा रथ हा श्री विद्यानृसिंह भारती श्री रधुनाथभट स्वामी (१६वे स्वामी ) यांच्या कारकीर्दीत्त शके १७९५ (सन १८७३) च्या सुमारास तयार करण्यात आला. हा रथ इतका भक्कम आहे की गेल्या जवळपास दीडशे वर्षात चाकांच्या दुरुस्ती व्यतिरिक्त रथाची मोठी दुरुस्ती करावी लागलेली नाही.


माघ शु. षष्ठीस रात्री कोठी पूजनाने रथोत्सवाचा प्रांरभ होतो. यावेळी उत्त्सवाच्या काळात अन्नधान्याची कमतरता भासु नये म्हणून श्री अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे श्री स्वामीच्या हस्ते श्रीफळ देऊन सेवेकर्यावर त्यांच्या त्यांच्या कामाची जबाबदारी सोपवली जाते.

माघ शुद्ध सप्तमीस म्हणजेच रथसप्तभीस रथाचे पूजन करुन रथावर कळस चढविला जातो. माघ शुद्ध अष्टमीस खास बनवलेल्या मोठ्या दोरखंडाने रथ श्री नारायण देवालयानजिक श्री बनंशकरी देवालय पर्यंत ओढून नेला जातो. नवमीस रथाचा तेथेच मुक्काम होतो.


माघ शुध्द दशमीस श्री गुरुस्वामी देवगोसावींची पुण्यतिथी आहे. हा दिवस यात्रेचा मुख्य दिवस असून याला महायात्रा किंवा भरजत्रा असे संबोधले जाते. या दिवशी देवगोसावींच्या समाधीचे पूजन करुन नंतर रथ परत श्रीमठाकडे ओंढून आणला जातो. या दिवशी ज्यांनी ज्यांनी यात्रेची जबाबदारी पार पाडली त्यांना श्री स्वामींच्या हस्ते श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. माघ पौर्णिमेस रथाचा कळस उतरवुन या रथोत्सवाची सांगता होते.