मठाचा इतिहासश्रुतिस्मृति पुराणानां आलयं करुणालयम् । ।
नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम् । । १ । ।

अनेकशक्तिसंघट्ट प्रकाश लहरी घन: । ।
ध्वान्तध्वंसो विजयते विद्याशंकर भारती । । २ । ।

संकेश्वर-करवीर पीठाचार्यं नमाम्यहम् । ।
श्रीमज्जगद्गुरुं साक्षात् सच्चिदानन्दमद्वयम् । ।३ । ।

श्रीमत् आद्य शंकराचार्यांच्या श्रृंगेरी मठावरील पीठस्थ सोळावे शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती (देवगोसावी) स्वामी सुमारे शके १५०० च्या सुमारास श्री क्षेत्र काशी यात्रेस निघाले असता, तेथुन पुढे बद्रिकाश्रमाजवळील हिमालयातील श्रीमद् आद्य शंकराचार्य यांचे गुरु श्री गोविन्द भगवत्पादाचार्यं यांची गुहा पाहून यावी म्हणून बरोबरच्या शिष्य वर्गास सांगून जर आपण निर्दिष्ट दिवशी गुहेतून बाहेर आलो नाहीं तर ; तुम्हापैकीं एकास गुरु करु करुन श्रृंगेरीस जावे असे सांगितले. पुढे निर्दिष्ट दिवशी गुरु स्वामी गुहेबाहेर न आलेने गुरु आज्ञेप्रमाणे एकास गुरु करुन श्रृंगेरीस परत गेले व पुस्तक संन्यास विधीने संन्यास विधी करुन पीठारोहण केले.पुढे काही काळाने गुरुस्वामी गुहेतुन बाहेर आले व दक्षिणेस शिवमोग्गा जवळील कूडलीक्षेत्री तुंगभद्रा संगमावर आले. श्रृंगेरीस पीठारोहण झालेचे वृत्त त्यांना कळाल्याने ते तेथेच शाहिले. पुढे थोडा वाद निर्माण होऊन म्हैसुर दरबारी निकाल झाला की ; श्रृंगेरी येथील संन्यासी स्वार्मीनी श्रृंगेरीस शारदाम्बा देवीची पूजा करुन रहावे व अविच्छिन्न शुध्द शिष्य परंपरा प्राप्त श्री गुरुस्वामी विद्याशंकर भारती (देवगोसावी) यांनी सर्व भारतभर संचार करावा. यानंतर श्री विद्याशंकर भारती स्वामींनी शिष्यांकडे कूडली मठ सोपवून उत्तरेकडे प्रवास करीत एकटेच संकेश्वरच्या वायव्येस वल्लभगडावर मुक्कामास आले. तेथील श्री हरिद्रादेवी (हरगम्मा) देवीच्या दर्शनास गेले असता, त्यांना दृष्टांत झाला की आपण काशीस न जाता येथेच श्री सांख्येश्वर महादेवाचे महास्थान आहे व कल्मशनाशिनी (हिरण्यकेशी) नदी आहे, तेथे वास्तव्य करुन सांख्येश्वराची आराधना कारावी. पुढे स्वामी नित्य कल्मशनाशिनी नदीकाठी शुक्लतीर्थावर स्नान करुन सांख्येश्वर पूजन व अनुष्ठान करुन हरिद्रादेवीच्या सान्निध्यात वास्तव्य करु लागले.

कालांतराने विजापूरच्या आदिलशहाचा सुभेदार रणदुल्लाखान कोकणात जात असता संकेश्वर येथील मुक्कामास असताना त्याला वल्लभगडावर स्वामी महाराज असल्याचे समजल्यावरुन तो दर्शनास गेला. श्री स्वामींच्या  तपप्रभावाने तो खूपच प्रभावित झाला. त्याने संकेश्वर येथे श्री सांख्येश्वर म्हणजेच श्री शंकरलिंग मंदिराभोवती मठ बांधवून देऊन संकेश्वर, अंकले व कमतनूर अशी तीन गावे इनाम करुन दिली. या गावांची देणगी उर्दू भाषेत ताम्रपटावर लिहिलेली आहे. रणदुल्लाखानने स्वामी महाराजांना इनाम देवविल्याचे वर्तमान कोल्हापुराचे सोमवंशीय राजा कृष्णराय यांना समजताच त्यांनी स्वामीमहाराजांना कोल्हापूरला नेऊन एक मठ बंधून दिला. स्वामी महाराज संकेश्वरलाच रहात असत. काही वेळा कोल्हापूरलाही जात असत. तेव्हापासून श्रीमद् आद्य शंकराचार्यांची शुध्द व अविच्छिंन्न परंपरा संकेश्वर-करवीर पीठावर चालू झाली . संकेश्वर-करवीर पीठालाच श्रृंगेरी मठ पीठ असे लिहून सनदा-कागदपत्रे दिली जात असत. त्याच प्रमाणे श्रींच्या बिरुदावलीतही " ऋष्यशृंगपुरवराधीश "असे विशेषण आहे. यावरुन संकेश्वर - करवीर हेच मुळ शृंगेरीपीठ असुन शुद्ध व अविच्छिंन्न परंपरा म्हणून अधिकारी पीठ होय. यावेळी असे ठरले की, श्रृंगेरीपीठाचा अधिकार तुंगभद्रेच्या दक्षिणेस चालेल. तुंगभद्रेच्या उत्तरेकडे मलप्रभेपर्यंत कुडलीपीठाचा अधिकार असेल. आणि या संकेश्वर - करवीर पीठाचा संचार करण्याचा अधिकार मलप्रभेच्या उत्तरेकडे गोकर्ण गोव्यासह कोंकण, तुळजापूर, नागपूर, ग्वाल्हेर, दिल्ली, मधुरा, लखनऊ, वाराणशी, गया असा संपूर्ण मध्य भारत आणि हिमालयापर्यंत्त आहे. इतका मोठा संचाराचा अधिकार इतरास नाही. या मठास निरनिराळ्या राजेरजवाड़े व जमीनदाराकडून २८ गावे संपूर्ण इनाम व बेळगाव, विजापूर, कोल्हापूर , सांगली, रत्नागिरी, सातारा, नाशिक, अकोला जिल्ह्यात आणि मराठवाडा, तेलंगण व आंध्रप्रदेशातही इनाम जमिनी आहेत.