मठातील वार्षिक उत्सव


दरवर्षी श्रावण मासात हा कार्यक्रम होतो. हे मठातील खूप जुन्या काळापासुन चालत आलेले परंपरागत अनुष्ठान आहे. श्रावण मासात मृत्तिकेची एक कोटी लिंगे बनवुन त्यांचे अर्चन करावयाचे असा हा संकल्प आहे. यासाठी दररोज मृत्तिकालिंगे तयार करुन त्यांचे पूजन केले जाते.

श्रावण अमावस्येला या कोटिलिंगार्चनाची सांगता केली जाते. या दिवशी मोठी मृत्तिकापिंडी व मृत्तिकानंदी बनबिला जातो. पूजन-अर्चन करुन वाजत गाजत याचे विसर्जन केले जाते. या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. हजारो भक्त याचा लाभ घेतात


मुस्लिम समाजाच्या उरुस कार्यंक्रमासाठी प्रथम मठाकडून गलेफ दिला जातो.  त्यानंतर उरुस सुरु होतो. मोहरम सणामध्येही दोन पीर मठाचे असतात. पीर विसर्जनाच्या वेळी सायंकाळी मठाच्या दारात येतात. नंतर स्वामींच्या हस्ते ऊद घातला जातो व सर्व मुस्लिम बांधवांना गुळ वाटला जातो. ही अनेक वर्षाची परंपरा आहे.

श्रीमठातील नवीन उपक्रम :- श्रीमठामधे " श्री विद्याशंकर " पाठशाला अलीकडेच सुरु केली आहे.  अध्यापक म्हणून कब्बूरचे वेदमुर्ती श्री दत्तात्रय भट्ट जोशी यांची नियुक्ती केली आहे. मठामध्ये संध्या वगैरे नित्यविधी शिकण्यासाठीही लोक येत आहेत.


स्थानिक माता भगिनींना भगवद् गीता शिकवण्यासाठी सौ. अरुणा कुलकर्णी येतात. लहान मुलांना स्तोत्रे वगेरे शिकवण्यासाठी संस्कार वर्ग चालवण्यासाठी सौ. श्रावणी जोशी येतात. मठामध्ये वेगवेगळ्या उत्सवा निमित्ताने गावातील भजनी मंडली भजने सादर करतात.

श्रीमठातीलं नित्य कार्यक्रम 


पहाटे शंकरलिंगाची पूजा सुरु होऊन आठ वाजता आरती होते.

श्री संस्थान देव शारदांबा समेत चंद्रमौलीश्वर, सिद्धी बुद्धी समेत दशभुजा महागणपती, शाकंभरी, लक्ष्मी व्यंकटेश, मार्तंड भैरव, लक्ष्मी नृसिंह दत्तात्रय, ललितामहात्रिपुरसुंदरी वगैरे देवतांची पूजा एकादशरुद्र, पुरुषसूक्त, अथर्वशीर्ष, ब्रह्मणस्पतीसुक्त या मंत्रांनी पंचामृत अभिषेक स्वत: स्वामी महाराज करतात. ललिता सहस्त्रनाम, त्रिशती आष्टोत्तर शत, खड्गमाला यांनी श्रीचक्र कुंकूमार्चन होते. ब्राम्हणांकडुन चंडी सप्तशती पारायण होते. १२ वाजता वैश्वदेव, महानैवेद्य होतो. 


दर पौर्णिमेस श्री मठातफें दुपारी १२ ते ३ पर्यंत महाप्रसाद होतो.  भक्तांकडुन श्री शंकरलिंगास पंचामृतामिषेक, एकादश रुद्राभिषेक, शतरुद्राभिषेक, महारुद्राभिषेक करविला जातो. महाशिवरात्रीपासुन पुढे चार महिने श्री शंकरलिंगास दहीभाताची पूजा (बुत्ती पूजा) केली जाते.